- आवेश जनरल स्टोअर्स येथे छापा टाकून प्रतिबंधित गुटखा ताब्यात घेण्यात ।
कल्याण : कल्याणमध्ये प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी पुन्हा एकदा संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यावरील बिस्मिल्ला मस्जिद परिसरातील आवेश जनरल स्टोअर्स येथे छापा टाकून प्रतिबंधित गुटखा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी संबंधित दुकानचालकाविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानचालक मदार सय्यद यांच्याविरुद्ध प्रतिबंधित गुटख्याचा साठा बाळगणे आणि विक्री केल्याप्रकरणी हवालदार प्रमोद शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही पंधरा दिवसांपूर्वी कल्याणमधील तीन टपरीचालकांवर कारवाई करून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करून नष्ट करण्यात आला होता. त्या कारवाईनंतर आता पुन्हा झालेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि कल्याण-डोंबिवली पोलीस अशा कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे ।
