सावंतवाडी स्थानकात गरीब रथ एक्सप्रेससह अन्य रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा , खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी ।

  • सावंतवाडी स्थानकात गरीब रथ एक्सप्रेससह अन्य रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा , खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी ।

ठाणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेससह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे. तर याबाबत व्यवहार्यता तपासून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. कोकणातील हजारो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी रोड स्थानकावर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा थांबा नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा प्रवाशांना अन्य दूरच्या स्थानकांवर जाऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठवून नागरिकांच्या भावना आणि गरजा त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. या मागणीत सावंतवाडी रोड स्थानकाचे वाढते महत्त्व, कोकणातील वाढती प्रवासी संख्या, पर्यटनाला मिळणारी चालना तसेच स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय यांचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी गरीब रथ एक्सप्रेससह इतर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा थांबा उपलब्ध झाल्यास प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल, असे खासदार डॉ. शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या मागणीची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित रेल्वे प्रशासनाला सावंतवाडी रोड स्थानकावर या रेल्वेगाड्यांचा थांबा देण्याच्या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवहार्यता अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. सावंतवाडी रोड स्थानकावर गरीब रथ एक्सप्रेससह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्ण, दिव्यांग प्रवासी तसेच व्यावसायिकांना प्रवासासाठी अधिक चांगला पर्याय उपलब्ध होईल. पर्यटन, स्थानिक व्यापार आणि आर्थिक व्यवहारांनाही त्याचा सकारात्मक फायदा होणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी आणि कोकणातील रेल्वे सुविधांमध्ये वाढ व्हावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे ।