नाले, गटारे नवीन बनवायच्या होत्या तर काँक्रिट रस्ते बनवायच्या आधी का नाही हे बनवून घेतले ? असा प्रश्न सर्व नागरिक विचारत आहेत ।

  • नाले, गटारे नवीन बनवायच्या होत्या तर काँक्रिट रस्ते बनवायच्या आधी का नाही हे बनवून घेतले ? असा प्रश्न सर्व नागरिक विचारत आहेत ।

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील काँक्रिट रस्ते तोडायची मालिका अद्याप सुरूच आहे. आता पावसाळा तोंडावर आला असतानाही डॉ नानासाहेब धर्माधिकारी रोडवरील चार बिल्डिंग, गौरीनंदन सोसायटी जवळील मुख्य रस्ता हा आता नाल्याच्या बांधकामासाठी एमआयडीसी ठेकेदाराकडून तोडण्यात आला आहे. आता हा रस्ता वाहतुकीसाठी आणि जनतेला पायी चालत जाण्यासाठी कमीतकमी एक महिना बंद राहणार आहे. याच ठिकाणापासून काही अंतरावर इंडो अमाईन कंपनी समोर पण रस्त्याच्या कडेचा बराचसा भाग आता तोडण्यास घेतला गेला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनव शाळेजवळील आणि कावेरी चौक ते आजदे गाव हा काँक्रिट रस्ता तोडल्यामुळे तेथील वाहतूक अद्याप बंद आहे. यापुढेही एमआयडीसी मधील अनेक रस्ते तोडायची मालिका सुरूच राहणार असल्याचे समजले आहे. यामुळे नागरिकांत चीड आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाले, गटारे नवीन बनवायच्या होत्या तर काँक्रिट रस्ते बनवायच्या आधी का नाही हे बनवून घेतले असा प्रश्न सर्व नागरिक विचारत आहेत. परंतु याचे उत्तर ना प्रशासनाकडे ना लोकप्रतिनिधीकडे ना राजकीय पुढाऱ्यांकडे नसल्याने नागरिकही आता हतबल झाले आहेत. जर पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात वेळेवर सुरू झाला तर मात्र या नाल्यांची कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने मोठी पंचाईत होणार असून एमआयडीसी मध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ।