२७ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार, अमृत योजनेसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध ।

  • २७ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार, अमृत योजनेसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध ।
  • राज्य सरकार कडून अतिरिक्त ५० कोटींचा निधी मंजूर ।
  • खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची माहिती
  • कल्याण डोंबिवली महापालिका सभागृहात पार पडली आढावा बैठक 

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत योजनेच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाने नुकताच ५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. महापालिकेकडून ५० कोटी रुपये आणि राज्य शासनाकडून ५० कोटी रुपये, असा एकूण १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या माध्यमातून अमृत योजनेची उर्वरित कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत. येत्या काही महिन्यांत २७ गावांमध्ये जलवाहिन्या टाकणे, पाण्याच्या टाक्या उभारणे आदी कामांना गती मिळणार असून नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृहात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर हर्षाली चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तब्बल सहा तास चाललेल्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध विकासकामे वेगाने सुरू असून रस्ते, उड्डाणपूल, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा व्यवस्था यांसह विविध प्रकल्पांचा बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. शहरातील जलवाहिनी व्यवस्था जुनी झाल्याने नव्या पद्धतीने पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने २६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महापालिकांना विविध मार्गांनी निधी उभारण्याची विशेष तरतूद केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी कसा उपलब्ध करून देता येईल, याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम जलद गतीने सुरू असून या प्रकल्पाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. संबंधित विभागाला कामाला आणखी गती देण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. याचबरोबर शहरातील वाहतुकीला नवा आयाम देणाऱ्या यू-टाईप रस्ते प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. या तसेच इतर विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन महापालिका क्षेत्रातील बीएसयुपी घरांमध्ये करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पुनर्वसनापूर्वी बीएसयुपी घरांची गुणवत्ता आणि स्थिती उत्तम असावी, अशा सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या. डोंबिवली येथे उभारण्यात येत असलेल्या कॅन्सर हॉस्पिटल आणि सुतिकागृह प्रकल्पांचा आढावा घेताना येत्या दोन वर्षांत हे रुग्णालय पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तसेच शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांचा पुनर्विकास गतीने करून ठाणे शहराच्या धर्तीवर प्रत्येकी ५०० बेडची अत्याधुनिक रुग्णालये उभारण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. डोंबिवली पूर्व येथे महापालिकेच्या उपलब्ध जागेवर सॅटिस प्रकल्प उभारण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासाठी तातडीने सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कल्याण पश्चिमेतील सॅटिस प्रकल्पालाही गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. कचोरे आणि नेतिवली टेकडी येथे उभारण्यात येणारी महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत, संत सावळाराम महाराज स्मारक आणि शिवसृष्टी प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आला. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कार्यरत राहावे, अशा सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. कल्याण आणि परिसरातील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याण रिंग रोड प्रकल्पाचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या टप्पा एक ते टप्पा आठपर्यंतच्या कामांची माहिती घेण्यात आली. टप्पा तीनसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून त्या भागातील कामांना आता गती मिळणार आहे. उर्वरित भागांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. ठाणे आणि मुंबई शहराच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही नागरिकांना सुरक्षित आणि हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली परिसरातील क्लस्टर योजनेसाठी जागांची निश्चिती करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात महापौर आणि पालिका आयुक्त ठाण्यातील क्लस्टर प्रकल्पाला भेट देऊन त्याचा अभ्यास करणार असून त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीत योजना राबविण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात येतील, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. यावेळी उपमहापौर राहुल दामले, स्थायी समिती अध्यक्ष मल्लेश शेट्टी, नगरसेवक वरुण पाटील, प्रल्हाद म्हात्रे, रमिझ मणियार यांच्यासह अनेक मान्यवर नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते ।