- मानकोली ब्रिज परिसरात धोकादायक स्टंटबाजी करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई ।
डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील मानकोली ब्रिज परिसरात धोकादायक स्टंटबाजी करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधितांनी होंडा अॅक्टिवा (MH 05 EU 8768) या दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवून त्याची ‘रील’ तयार करून इंस्टाग्रामवर प्रसारित केली होती. या प्रकरणी गणेश राजू फोंडा रेड्डी (वय २२), कबीर मच्छिंद्र नेतकर (वय २२) आणि यश नितेश मालवणकर (वय २३, तिघेही रा. डोंबिवली पश्चिम) यांचा शोध घेऊन त्यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४ (धोकादायक वाहन चालविणे), १२८ (दुचाकीवर प्रवाशांची मर्यादा) व १२९ (हेल्मेट वापरासंबंधी नियम) अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच संबंधित दुचाकी ट्राफिक पोलिसांच्या मदतीने जप्त (इंपाऊंड) करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे ।
