कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे अभिनव उपक्रम ।

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे अभिनव उपक्रम ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने तृतीयपंथी नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम नुकताच राबविण्यात आला आहे. तृतीयपंथी बांधव-भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवणकाम, अगरबत्ती बनविणे व साबण बनविणे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर हर्षाली चौधरी आणि उपायुक्त कांचन गायकवाड यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना शिवणकाम किटचे वितरण करून करण्यात आले. महापौर हर्षाली चौधरी यांनी तृतीयपंथी समाजासाठी विविध योजनाच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्या करिता महापालिका शक्य तेवढ्या योजना या पुढेही राबविण्यात येतील असे सांगितले. महानगरपालिकेचा हा उपक्रम तृतीयपंथी नागरिकांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल असून, त्यांच्या कौशल्य विकासास चालना देणारा आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, समाजात सन्मानाने जीवन जगण्यासाठी मदत होणार आहे. यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या, महापालिका सदस्य मोरेश्वर भोईर, व समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी प्रशिक्षणार्थींना उपलब्ध संधीचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन केले. तसेच अशा प्रकारचे उपक्रम समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ।