कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हल्द्वानी, उत्तराखंड येथील सभेनंतर घडलेल्या कथित जातीय भेदभावाच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले ।

  • कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हल्द्वानी, उत्तराखंड येथील सभेनंतर घडलेल्या कथित जातीय भेदभावाच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले ।
कल्याण : काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ,कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्यसभा विरोधी पक्षनेते मा. खा. मल्लिकार्जुन खर्गे  यांच्या हल्द्वानी, उत्तराखंड येथील सभेनंतर घडलेल्या कथित जातीय भेदभावाच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मा. मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक करून कथित जातीय भेदभावाच्या घटनेचा तीव्र निषेध केला. उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कथित मनुवादी विचारसरणीचा निषेध करत सामाजिक समता, बंधुता, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाच्या समर्थनार्थ जोरदार भूमिका मांडली.
त्यानंतर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत निषेध मोर्चाने प्रस्थान केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर कल्याण तहसीलदार कार्यालयात जाऊन मा. तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये हल्द्वानी येथील कथित घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून, दोषी व्यक्तींची ओळख पटवून, तपासात संबंधित कायद्यांच्या तरतुदी लागू असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच सदर निवेदन मा. राष्ट्रपती महोदय, भारत सरकार यांच्यापर्यंत योग्य त्या माध्यमातून पाठविण्यात यावे, जेणेकरून या गंभीर प्रकरणाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन दोषींवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकेल, अशी मागणीही करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे काँग्रेस पक्षाने जातीय भेदभाव, सामाजिक विषमता आणि संविधानविरोधी विचारसरणीला विरोध करत भारताच्या संविधानाने दिलेल्या समानता, सामाजिक न्याय, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. या निषेध सत्याग्रहास कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ।