भाजपचे नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एकाच गाडीतून प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ।

  • भाजपचे नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एकाच गाडीतून प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ।

नवी दिल्ली :  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चा वेगात सुरू असतानाच राजधानी दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सदनातील बैठक अर्ध्यावर सोडून पुढे एकाच गाडीतून प्रवास केला. राष्ट्रवादीची भाजपसोबत वाढती जवळीक चर्चेचा मुद्दा बनलेला असताना तावडे-सुप्रिया सुळे यांच्या भेटीने आणि एकत्रित प्रवासाने ‘पवार’ सत्तेसोबत जाण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि भाजप यांच्यातील वाढत्या जवळीकतेच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करून एकत्रित राष्ट्रवादीला एनडीएत सामावून घेण्यास भाजप उत्सुक असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. दुसरीकडे मोदी सरकारसाठी अतिशय महत्त्वाचे लोकसभा पुनर्रचना विधेयक पुढच्या काही दिवसांत पटलावर मांडण्यात येणार असल्याने त्यावेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी भाजप उत्सुक आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे-विनोद तावडे यांच्यातील भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र सदनातील बैठक अर्धवट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस, राज्यसभेचे खासदार विनोद तावडे अचानक एका गाडीतून रवाना झाले. बैठक अपूर्ण सोडून अचानक एकाच गाडीतून रवाना झाल्याने दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत ।