स्वाइन फ्लू (H1N1) संदर्भात महापालिकेचे नागरिकांना आवाहन !

  • स्वाइन फ्लू (H1N1) संदर्भात महापालिकेचे नागरिकांना आवाहन !

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एका खाजगी रुग्णालयात स्वाइन फ्लू (H1N1) चे दोन रुग्ण आढळून आले होते. संबंधित दोन्ही रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या ते वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत. स्वाइन फ्लू (H1N1) हा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार असून बाधित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे (Droplets) त्याचा प्रसार होऊ शकतो. या आजारामध्ये प्रामुख्याने तीव्र ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात. नागरिकांना वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः औषधोपचार न करता त्वरित महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय तसेच महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी व उपचार करून घ्यावेत.

स्वाइन फ्लूपासून बचावासाठी नागरिकांनी खालील बाबींचे पालन करावे :

  • वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.
  • – खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यूचा वापर करावा.
  • – संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा.
  • – भरपूर पाणी पिऊन शरीरात पुरेशा प्रमाणात द्रव ठेवावा.
  • – गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करावा.
  • – आजारी असल्यास अनावश्यक बाहेर पडणे टाळावे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत स्वाइन फ्लू संदर्भात आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित महापालिकेच्या रुग्णालयांशी संपर्क साधावा ।