अयोध्या राम मंदिर दानपेटीतील कथित अपहाराच्या निषेधार्थ कल्याणमध्ये काँग्रेसचे ‘रघुपती राघव राजाराम’ आंदोलन ।

  • अयोध्या राम मंदिर दानपेटीतील कथित अपहाराच्या निषेधार्थ कल्याणमध्ये काँग्रेसचे ‘रघुपती राघव राजाराम’ आंदोलन ।

डोंबिवली : अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील रकमेचा कथित अपहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने देशभर सुरू केलेल्या ‘रघुपती राघव राजाराम’ आंदोलनाचा भाग म्हणून कल्याण शहरातही जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष डॉ. नवीन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. यावेळी देवी देवतांच्या वेशभूषेत आंदोलकांनी सहभाग घेतला होता.आंदोलनाची सुरुवात कल्याण येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करून करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मोर्चा काढला. या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या । छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या भव्य निदर्शनांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राम मंदिर दानपेटीतील रकमेच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. धार्मिक श्रद्धेशी संबंधित निधीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नवीन सिंग यांनी केंद्र सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक काँग्रेसचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तसेच साहेब पोलीस उपायुक्त होनमाने यांना मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन दिले.या आंदोलनामुळे काही काळ शिवाजी मंदिर चौक परिसरात घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले होते. पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवत आंदोलन शांततेत पार पडण्याची खबरदारी घेतली ।