- “President Cup India 2026” टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ ।
- ३१ मार्च रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार कार्यक्रम ।
- खासदार आणि आयटीसीएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने स्पर्धांचे आयोजन ।
ठाणे : टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India – 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ येत्या ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रयत्न होत आहे. आयटीसीएसएफ या स्पर्धेचा नुकताच लॉन्चिंग सोहळा पार पडला. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) च्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. येत्या ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा देशातील १६ राज्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यामुळे मोठ्या संख्येने क्रिकेट खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. खेळाडूंना अधिक संधी मिळाव्यात आणि त्यांच्या मेहनतीला योग्य सन्मान मिळावा, या उद्देशाने ‘प्रेसिडेंट्स कप इंडिया’ स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट १ कोटीपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णयही आयटीसीएसएफने घेतला आहे. ही केवळ बक्षीस रक्कम नसून प्रत्येक खेळाडूच्या मेहनतीचा आणि कष्टांचा सन्मान असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. देशातील विविध भागांतील एकूण १६ संघांचा सहभाग या स्पर्धेत असून त्यामध्ये महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स (वेस्ट बंगाल), मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स (तमिळनाडू), यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स हे संघ सहभागी होत असून, स्पर्धेत अत्यंत रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विजेत्या संघाला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, एकूणच स्पर्धेतून कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचे वितरण होणार आहे. त्यामुळे देशभरातील खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार आहे. “President Cup India 2026” ही स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या विकासासाठी आणि नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने पूर्णत्वास जात असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू आणि मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे ।
