इमारतीला तडे गेल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण, घटनेची माहिती मिळताच भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली ।

  • इमारतीला तडे गेल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण, घटनेची माहिती मिळताच भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली ।

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या कर्करोग रुग्णालयाच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे ५० फूट खोल खड्ड्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर माती खचून संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे लगतच्या इमारतीला तडे गेल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिकेचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांशी चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबवून परिसर सुरक्षित करण्यासह आवश्यक तांत्रिक तपासणी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला.दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले ।