डोंबिवलीच्या खोणी-पलावा भागात पोलिसांचे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन 

  • डोंबिवलीच्या खोणी-पलावा भागात पोलिसांचे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन 
२४ विदेशी नागरिक ताब्यात 
– ८ जणांकडे कोणतेही कागदपत्र नाहीत  
– गुन्हेगारी प्रकरणात सहभागी ९ जणांचे पासपोर्ट आधीच कोर्टात जमा  
– रेंट अ‍ॅग्रीमेंट व पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय सोसायटीत राहत होते  
डोंबिवली : डोंबिवलीच्या खोणी-पलावा परिसरात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून  २४ विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये नायजेरिया, युगांडा आणि घानाच्या नागरिकांचा समावेश आहे. मानपाडा पोलिसांना या भागात विदेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या २४ जणांमध्ये १४ पुरुष, ६ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे. यापैकी फक्त  ७ जणांकडे वैध कागदपत्रे सापडली. ८ जणांकडे ना पासपोर्ट होता ना व्हिसा. तर गुन्हा दाखल असल्याने  ९ जणांचे पासपोर्ट आधीच कोर्टात जमा आहेत. झेंडे म्हणाले की, हे सर्वजण रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय राहत होते, जे बेकायदेशीर आहे. डीसीपी अतुल झेंडे यांच्या माहितीनुसार, डोंबिवलीची मानपाडा पोलीस आणि नवी मुंबई पोलीस यांनी मिळून ही कारवाई केली. यामध्ये मानपाडाचे सीनियर पीआय संदीपान शिंदे आणि त्यांच्या टीमची विशेष भूमिका होती. पोलिस आता ताब्यात घेतलेले विदेशी नागरिक ड्रग्ज तस्करीत सहभागी आहेत का याचा तपास करत आहेत. डीसीपी झेंडे यांनी स्पष्ट केले की, ज्या घरमालकांनी रेंट अ‍ॅग्रीमेंट व व्हेरिफिकेशनशिवाय घरे भाड्याने दिली, त्यांच्यावरही कारवाई होईल. सध्या सर्वांची चौकशी सुरू असून कागदपत्रांची तपासणी व बॅकग्राउंड व्हेरिफिकेशननंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.