फ्लायओव्हरची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निर्देश 

  • मेट्रोसोबत फ्लायओव्हरही जलदगतीने पूर्ण करा !
  • फ्लायओव्हरची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निर्देश 
  • एमएमआरडीए मुख्यालयात पार पडली महत्वाची बैठक 

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक लक्षात घेता मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच रस्ते वाहतुकीसाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रो १२ च्या डबल डेकर रचनेखाली प्रस्तावित फ्लायओव्हरची कामे जलदगतीने मार्गी लावून नागरिकांना या मार्गांचा वाहतुकीसाठी लवकरात लवकर वापर करता यावा, असे स्पष्ट निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. मेट्रोच्या खालून जाणारे हे फ्लायओव्हर कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांना एक नवा आणि अधिक वेगवान पर्याय उपलब्ध होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना अधिक गती देण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त (१) पी. वेलारासू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, भूसंपादन, प्रशासकीय मान्यता, विविध परवानग्या, तांत्रिक अडचणी तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. कल्याण लोकसभेत मेट्रो १२ प्रकल्पाचे काम सध्या जलदगतीने सुरू असून या प्रकल्पाला आणखी गती देण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. या मेट्रो मार्गावर डबल डेकर पद्धतीने वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असून त्याखालील फ्लायओव्हरचे कामही मेट्रोच्या कामासोबतच गतीने पुढे नेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. फ्लायओव्हरसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि इतर प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. फ्लायओव्हरचे काम पूर्ण होईपर्यंत मेट्रो स्थानकांसाठी आवश्यक जमीन आणि इतर परवानगी प्रक्रिया पूर्ण करून स्थानक उभारणीचा मार्गही मोकळा ठेवावा, जेणेकरून मेट्रो आणि फ्लायओव्हर या दोन्ही कामांची गती कायम राहील, असे निर्देश त्यांनी दिले. मेट्रोच्या खालून जाणाऱ्या फ्लायओव्हरमुळे मेट्रो आणि रस्ते वाहतूक यांचा समन्वय साधला जाणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे फ्लायओव्हरवर चढण्यासाठी आणि तेथून खाली उतरण्यासाठी आवश्यक जोडरस्ते, मार्गिका आणि वाहतूक नियोजन आतापासूनच निश्चित करून त्यानुसार कामे सुरू करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फ्लायओव्हरचा वापर सुरू करण्यासाठी स्वतंत्रपणे कामे करण्याची वेळ येऊ नये, तर दोन्ही सुविधा एकाचवेळी नागरिकांच्या सेवेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. कल्याण-तळोजा मेट्रो १२ च्या सुरू असलेल्या कामाला गती देण्यासोबतच शिळफाटा-मुंब्रा-कळवा मार्गे ठाणे अशी मेट्रो १२ ब विस्तारित मार्गिका प्रस्तावित करण्यात आली आहे. या विस्तारित मार्गिकेच्या कामाबाबतही पुढील कार्यवाही जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या मार्गिकेमुळे कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या परिसरांमधील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर मेट्रो ५, ५ अ, ५ ब तसेच कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो १४ या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गिकांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. या सर्व प्रकल्पांची कामे वेळेत आणि जलदगतीने पुढे नेण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. मेट्रोचे जाळे विस्तारताना त्याची रस्ते वाहतुकीशी प्रभावी जोडणी होईल आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन संपूर्ण परिसराची एकात्मिक वाहतूक व्यवस्था विकसित होईल, यावर बैठकीत भर देण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा वेगाने होणारा शहरी विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील अनेक वर्षांच्या वाहतूक गरजा डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पांची आखणी केली जात आहे. मेट्रो, फ्लायओव्हर, रिंग रोड, एक्सेस कंट्रोल मार्ग, सॅटिस आणि फ्रीवे या सर्व प्रकल्पांचे एकत्रित जाळे निर्माण झाल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, वेगवान आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे केवळ प्रकल्प सुरू करणे नव्हे, तर ते वेळेत पूर्ण करून नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले प्राधान्य असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कल्याण-डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, माजी आमदार राजू पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर अमर लुंड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळ यांच्यासह विविध महापालिका व प्रशासकीय संस्थांचे अधिकारी, अभियंते तसेच शिवसेनेचे स्थानिक महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक उपस्थित होते. कल्याण पूर्व यू-टाईप रस्ता आणि श्रीमलंग रस्ता या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादन जलदगतीने पूर्ण करण्यासोबतच बाधित नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याबाबत चर्चा झाली. पुढील टप्प्यात क्लस्टर योजनेच्या माध्यमातून बाधित नागरिकांना घरे तसेच व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून देण्याच्या नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. ऐरोली-काटई फ्रीवे प्रकल्पाच्या कामाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. काटई नाका येथील बोगद्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासोबतच फ्रीवेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या ऑक्टोबरमध्ये दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. ऐरोली-काटई फ्रीवे पूर्ण झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली या शहरांना जोडणाऱ्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या आरेखनाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. पूर्व-पश्चिम भागांना प्रभावी जोडणी मिळण्यासोबतच या मार्गाची डबल डेकर मार्ग आणि मेट्रो १४ सोबत जोडणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन विविध प्रकल्प एकमेकांना पूरक ठरतील, अशा पद्धतीने त्यांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डोंबिवली आणि टिटवाळा यांच्यातील प्रवास अधिक सुलभ करणाऱ्या कल्याण रिंग रोडच्या विविध टप्प्यांचाही आढावा घेण्यात आला. टप्पा ३ साठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासोबतच उर्वरित टप्प्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सक्तीच्या सूचना देण्यात आल्या. रिंग रोडमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याने या प्रकल्पाला आवश्यक ती गती देण्यावर भर देण्यात आला. वाहतुकीचे विविध प्रकल्प उभारताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. प्रकल्पांच्या मार्गात येणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचे स्थलांतर अथवा पर्यायी उपाययोजना वेळेत करण्यात याव्यात, जेणेकरून अशा कारणांमुळे प्रकल्पांच्या कामाला विलंब होणार नाही, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. तिसऱ्या पत्रीपुल उभारणीचे काम सुरू असून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित जागेचे भूसंपादनही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या प्रकल्पांसह सर्व महत्त्वाच्या रस्ते आणि वाहतूक प्रकल्पांमध्ये समन्वय साधून कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. अंबरनाथ-बदलापूर-उल्हासनगर संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. प्रकल्पातील शेड उभारणी, यंत्रसामग्री आणि इतर उर्वरित कामे वेळेत पूर्ण करून कोणताही विलंब न करता प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले. येत्या नोव्हेंबरमध्ये हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचे नियोजन असून त्यानुसार संबंधित यंत्रणांनी कामाला गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले. अंबरनाथ सॅटिस प्रकल्पासाठी आवश्यक जागा, प्रशासकीय मान्यता आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सुमारे ८० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डोंबिवली सॅटिस प्रकल्पाचे कामही लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. तर उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून सॅटिस प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या ।