- कल्याण लोकसभेत ३५ हजार चौरस फुटांचा विश्वविक्रमी तिरंगा फडकणार
- स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत विश्वविक्रमी तिरंगा रॅली
- ५० हून अधिक शाळा, १५ हजार विद्यार्थी आणि १०० हून अधिक सामाजिक संस्था सहभागी होणार
डोंबिवली : देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव यंदा डोंबिवलीत अभूतपूर्व स्वरूपात साजरा होणार असून, देशप्रेम आणि राष्ट्राभिमानाचा नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शहरातील १०० हुन अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी ‘भव्य तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया!’ अशी साद देत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत हजारो डोंबिवलीकर एकत्र येत तब्बल ३५ ते ३६ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा घेऊन मार्गक्रमण करणार आहेत. भारतात यापूर्वी लांब तिरंगा घेऊन चालण्याचा जो विक्रम नोंदविण्यात आला आहे, तो मोडून डोंबिवलीकरांच्या सहभागातून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार या उपक्रमातून करण्यात आला आहे. डोंबिवली शहरात शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात होणार असून, रॅलीचा प्रत्यक्ष प्रारंभ सकाळी ७.३० वाजता डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक( घारडा सर्कल) येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक परिसरातून होईल. या ठिकाणी हजारो विद्यार्थी आणि नागरिक एकत्र येऊन विशाल तिरंगा हाती घेत राष्ट्राभिमानाने रॅलीत सहभागी होतील. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली रॅली लोकमान्य टिळक पुतळ्याच्या दिशेने, चार रस्ता, नेरुरकर पथ मार्गे दत्तनगर चौकाकडे मार्गस्थ होईल. दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील तब्बल १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ या रॅलीचा दिमाखदार समारोप होणार असून, याच ठिकाणी १५० फूट उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या विश्वविक्रमी तिरंगा रॅलीमध्ये डोंबिवली आणि परिसरातील जवळपास ५० ते ५५ शाळांचा सहभाग असणार असून, सुमारे १५ हजार विद्यार्थी या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होणार आहेत. त्याचबरोबर १०० हून अधिक सामाजिक संस्था या रॅलीत सहभागी होणार आहेत. डोंबिवलीतील साहित्य, सामाजिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, सैन्यदलातील माजी सैनिक, स्काऊट-गाईड, एनसीसी आणि एनएसएसचे कॅडेट विद्यार्थी, तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि राष्ट्रीय व राज्यस्तरावर विविध क्षेत्रांत गौरविले गेलेले मान्यवर डोंबिवलीकर यांचाही या उपक्रमात सहभाग असणार आहे. विविध क्षेत्रांतील सुमारे २५ हजार नागरिक या ऐतिहासिक सोहळ्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत. याशिवाय सर्व राजकीय पक्षांचे सन्माननीय आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही या राष्ट्रभक्तीच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. रॅलीच्या संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर गीते वाजविण्यात येणार असून, विविध ठिकाणी देशभक्तीपर गीतांचे आणि नृत्यांचे विशेष सादरीकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण डोंबिवली शहराचा परिसर तिरंगामय आणि देशभक्तीच्या वातावरणाने भारावून जाणार आहे. हजारो विद्यार्थी, सामाजिक संस्था, माजी सैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र येत ‘एक तिरंगा, एक देश, एक अभिमान’ या भावनेचा प्रत्यय या रॅलीतून देणार आहेत.या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मोठ्या आकाराचा तिरंगा घेऊन चालण्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून, समाजातील विविध घटकांना एका तिरंग्याखाली एकत्र आणण्याचा हा राष्ट्रभक्तीचा महाउत्सव ठरणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत, माजी सैनिकांपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत आणि सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाचा या उपक्रमात सहभाग असणार आहे. त्यामुळे डोंबिवलीच्या सामाजिक एकतेचे आणि देशप्रेमाचे दर्शन या रॅलीच्या माध्यमातून घडणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या भव्य रॅलीच्या माध्यमातून भारताच्या तिरंग्याचा गौरव जागतिक पातळीवर अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ३५ ते ३६ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा घेऊन हजारो नागरिक एकत्रितपणे मार्गक्रमण करत नवा विक्रम प्रस्थापित करणार असून, या ऐतिहासिक विक्रमाची अधिकृत नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. डोंबिवलीकरांच्या सामूहिक सहभागातून घडणारा हा क्षण केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा ठरणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी भाव जपणारा, राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढविणारा आणि नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा हा ऐतिहासिक उपक्रम अविस्मरणीय करण्यासाठी डोंबिवली आणि कल्याण लोकसभा परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, माजी सैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि देशप्रेमी बांधवांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारडा सर्कल) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे ।
