- डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंसह पाच जणांवर गुन्हा ।
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि दोन परिचारिकांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या चार समर्थकांविरोधात विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव साळुंखे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एका प्रभावशाली लोकप्रतिनिधीकडून हस्तक्षेप झाल्याचा आरोपही समोर आला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे । कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील मारहाणीच्या घटनेचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावरून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून मानवतेची सेवा आहे. डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रतिकूल व तणावपूर्ण परिस्थितीतही दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले ।
