कल्याणमध्ये पाच भटक्या कुत्र्यांचे मृतदेह नाल्यात आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ, कंत्राटदार अमित सावंत आणि व्यवस्थापक उमेश राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल ।
कल्याण : कल्याणमध्ये पाच भटक्या कुत्र्यांचे मृतदेह नाल्यात आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्राणीप्रेमींनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या खाजगी श्वान निर्बीजिकरण केंद्राशी संबंधित कर्मचाऱ्यांनीच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार अमित सावंत आणि व्यवस्थापक उमेश राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमधील एका नाल्यात पाच भटक्या कुत्र्यांचे मृतदेह आढळले होते. ही घटना उघडकीस येताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. प्राणीमित्र आणि नागरिकांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान या घटनेचा संबंध महापालिकेच्या खाजगी श्वान निर्बीजिकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांशी असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित कंत्राटदार आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पोलिसांचा अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडूनही संबंधितांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे प्राणी संरक्षण आणि निर्बीजिकरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ।
