नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्तुतीसुमने ।

  • नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्तुतीसुमने ।
    खा. नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस उत्साहात साजरा ।

सिंधुदुर्ग : नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस, त्यांच्या कामामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना मानणारा वर्ग तयार झाला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांचे कौतुक केलं. नारायण राणे यांच्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असल्याने त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा विचार सोडला नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस (अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पण सोहळा) सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नारायण राणेंसोबत काम करताना मिळालेल्या अनुभवांची आठवण सांगितली. मी सभागृहात पहिल्यांदा भाषण केलं, तेव्हा राणेंनी पाठवलेली ‘छान बोललास’ ही चिठ्ठी आजही आठवते, असे ते म्हणाले. त्यांनी पुढं सांगितलं की, नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करणे ही मोठी संधी होती. दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंची अर्थसंकल्पावरची पकड विलक्षण होती. ते एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे बजेटवर बोलायचे. युती सरकारच्या काळात झालेल्या कामाची काँग्रेस सरकारने श्वेत पत्रिका काढल्यानंतर नारायण राणेंनी त्यावर ‘भगवी पत्रिका’ मांडत सरकारची जोरदार बाजू मांडली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. विधानसभेत राणेंचा मोठा दरारा होता. त्यांच्या नेतृत्वामुळे विरोधी पक्षात असतानाही आम्ही सरकारवर तुटून पडायचो, असं फडणवीस म्हणाले. राणेंचा दिलदार स्वभाव आणि राज्यभर तयार झालेला जनाधार यावरही त्यांनी भाष्य केले. “राणे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस आहे. कोकणातील माणूस बाहेरून कठोर आणि आतून गोड असतो, असं पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे, ते राणेंना पाहूनच लिहिलं असावे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी राणेंच्या कुटुंबीयांचाही उल्लेख केला. नीलम राणे यांचा त्यांना नेहमीच भक्कम पाठिंबा आहे. तसेच नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात त्यांचा राजकीय वारसा स्पष्टपणे दिसतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. राणेंनी कोकणाच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, “ते देश आणि राज्याचे नेते असले तरी त्यांच्या हृदयात कोकण आहे. राणेंना अजून खूप नेतृत्व करायचे आहे. त्यांचा 100वा वाढदिवसही आपण अशाच मोठ्या मैदानावर साजरा करू ।