- काँग्रेसच्या धोरण लकव्यामुळेच भारतात नक्षलवाद फोफावला
- शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका
- नक्षलवादमुक्त गडचिरोली बनले भारताचे स्टील हब
- लोकसभेतील चर्चेत डाव्या विचारसरणीला पोसणाऱ्या काँग्रेसला आरसा दाखवला
- ‘नक्षलमुक्त भारत’ करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे केले कौतुक
नवी दिल्ली : नक्षलवादाचा बंदोबस्त करण्याऐवजी डाव्या कडव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडी करुन सत्तेत राहण्याची काँग्रेसची मजबुरी होती. नक्षलवादाविरोधात समर्थपणे लढण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, धोरण लकवा यामुळे एका गावातून सुरु झालेला नक्षलवाद १२ राज्य आणि २०० जिल्ह्यांमध्ये फोफावला, अशी घणाघाती टीका शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. काँग्रेसने देशाला नक्षलवाद दिला तर ‘एनडीए’ सरकारने देशाला विकासाचा मार्ग दाखवला, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. आज लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विशेष चर्चेत ते बोलत होते. निर्धारित उद्दिष्टापूर्वीच भारताला नक्षलमुक्त केल्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले. देशातून नक्षलवादाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये लष्कर, सीआरपीएफ, महाराष्ट्राचे सी-६० च्या जवानांना खासदार डॉ. शिंदे यांनी धन्यवाद दिले. गृहमंत्री अमित शाह यांनी वर्षभरापूर्वी याच सभागृहात देशातून डाव्या कडव्या विचारसरणीचा नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पूर्वी संपुष्टात आणू, असे जाहीर केले होते. आज एक दिवस आधीच केंद्र सरकारने हे उद्दिष्ट साध्य केले. माओवाद आणि नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली त्याचे परिणाम आज देशात दिसत आहेत. भारतातून डाव्या कडव्या विचारसरणीचा नक्षलवाद संपुष्टात आला, असे ते म्हणाले. काँग्रेस सरकारच्या काळात आदिवासी, शोषित पिडितांसाठी काहीच केले नाही, त्यामुळे त्यांना नाईलाजाने शस्त्र हातात घ्यावी लागली. काँग्रेसच्या धोरण लकव्यामुळे देशात नक्षलवाद फोफावला, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केले. मात्र आज आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. आज देशाच्या सर्वोच्चपदी आदिवासी समाजातील महिला नेतृत्व विराजमान आहेत, हा देशासाठी बहुमान असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. आदिवासी, शोषित पिडितांचा विश्वास प्राप्त करुन सरकारने नक्षलग्रस्त भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारने केले. हा काँग्रेस आणि एनडीए सरकारमधील फरक आहे, असे ते म्हणाले. नक्षलवादाला खतपाणी घालणारी काँग्रेसची भूमिका होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. पशुपती ते तिरुपतीपर्यंत भूभाग काबिज करणाऱ्या नक्षलींबरोबरच शेजारील पाकिस्ताननेही याचा गैरफायदा घेतला. नक्षलवाद्यांनी आणि पाकिस्तानच्या सिमी, आयएसआय संघटनांना सोबत घेऊन देशांतर्गत सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचवला. काश्मिरमधील फुटीरतावाद्यांना बळ देणे, पूर्वेत्तर राज्यातील कडव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांना सत्तेत सोबत घेऊन काँग्रेसने देशांतर्गत सुरक्षा धोक्यात आणली होती, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. नक्षलींचा कुख्यात नेता मडवी हिडमा यांचा लष्कराने खात्मा केला तेव्हा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी ही बनावट चकमक होती, अशी टीप्पणी करुन संशय व्यक केल्याची आठवण खासदार डॉ. शिंदे यांनी सभागृहाला करुन दिली. ते पुढे म्हणाले, आजच्या घडीला भारतातील १० हजारांहून अधिक नक्षलींनी शस्त्र त्यागून शरणागती पत्कारत विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग स्वीकारला. वर्ष २०२५ मध्ये केंद्र सरकारने नक्षलवादाविरोधात हाती घेतलेल्या मोहीमेमध्ये ३१७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ८६२ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर १९०० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कारली. वर्ष २०२४-२५ मध्ये २८ नक्षली नेते मारले गेलेत. वर्ष २०२६ मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यात ६३० नक्षलींनी शरणागती पत्कारली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जात होता. मात्र आता तो भारतातील स्टील हब बनला आहे. या जिल्हात ५००० तरुणांना रोजगार देण्याचे काम महायुती सरकारने केले. २०१४ मध्ये महाराष्ट्रात ५५० नक्षली होते आज ही संख्या ५६ पर्यंत खाली आली आहे. गडचिरोलीमध्ये विकासाचा मार्ग स्वीकारत मागील १० वर्षांत शेकडो नक्षलींने शरणागती पत्कारली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले ।
