- भाजपाने आता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदावर आपला दावा ठोकला ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. महापौर पदाच्या निवडीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महासभेची तारीख अखेर निश्चित झाली असली, तरी भाजपाच्या एका नवीन मागणीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसे यांची युती आहे.त्याचवेळी भाजपाने आता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदावर आपला दावा ठोकला आहे. यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजपामध्ये या पदांवरून रस्सीखेच होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केडीएमसीमध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाकडे महापौर पद आहे, तर उपमहापौर पद भाजपाकडे आहे. मात्र, केवळ उपमहापौर पदावर समाधान न मानता भाजपाने आता सत्तेतील महत्त्वाच्या वाटा असलेल्या स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदाची मागणी केली आहे. कल्याणमध्ये पार पडलेल्या भाजप नेत्यांच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, उपमहापौर राहुल दामले आणि इतर ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी मिळून भाजपाला या दोन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी मिळावी, असा सूर लावला आहे. या मागणीसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार असून त्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, शिवसेना आपली पकड मजबूत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. स्थायी समितीत आपले निर्विवाद बहुमत असावे, यासाठी शिंदे गटाने ठाकरे गटाच्या 3 नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवले आहे. महापालिका निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या गटांच्या गणितात शिवसेना शिंदे गट, मनसेचे 5 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 सदस्य असे मिळून एकूण 59 सदस्यांचे बळ शिंदे गटाकडे आहे. अशा परिस्थितीत, ज्या पक्षाचे जास्त सदस्य असतात, त्याच पक्षाचा स्थायी समिती सभापती असावा असा अलिखित नियम पाळला जातो. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आपले वर्चस्व असलेले हे पद भाजपला सोडणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली महासभा आता होणार असून यामध्ये स्थायी समिती, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्य पदांची निवड केली जाणार आहे. ठाकरे गटातील 11 पैकी 3 नगरसेवक अद्याप त्यांच्या मूळ गटात परतलेले नाहीत, ज्याचा थेट फायदा शिवसेनेला होणार आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने चिंतन बैठका घेतल्या जात असल्या तरी त्यातून अद्याप कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. आता प्रत्यक्ष महासभेच्या दिवशी भाजपा आपल्या मागणीवर ठाम राहते की युती धर्माचे पालन करत तडजोड करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेनं भाजपाची मागणी फेटाळली, तर भाजपची पुढची भूमिका काय असेल, यावर केडीएमसीतील सत्तेचे भवितव्य अवलंबून असणार आहे ।
