- नवी मुंबईत महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे कोणी काम करू नये
- खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आवाहन
- शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना सुनावले खडेबोल
प्रमोद कुमार
नवी मुंबई : केंद्रात आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. तर राज्यात आपले महायुती सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही सर्वजण युतीचा सन्मान ठेऊन निवडणुका लढलो आणि विविध महापालिकांमध्ये युती म्हणूनच सत्ता स्थापन केली. मात्र काही जण सध्या युती मध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. महायुतीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये. असे आवाहन यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. तर एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या तीन वर्षात तब्बल तीन दशकांचे काम करून दाखवलं आहे, असे प्रतिपादन ही यावेळी केले.नवी मुंबईतील ऐरोली येथे आज शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांचा भव्य अभिनंदन व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व विजयी नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास नवी मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी हे भाष्य केले.नवी मुंबई आणि शिवसेनेचे नाते अतूट आहे. येथील नागरिकांनी कायमच शिवसेनेला भक्कम पाठिंबा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करत शिवसेनेच्या तब्बल ४२ नगरसेवकांना विजयी केले. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिवसेना राज्यभर विजयी घोडदौड करत आहे. विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातील क्रमांक दोनचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना प्रभावीपणे कार्यरत असल्याचे मत यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी व्यक्त केले. महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहेत. त्याच धर्तीवर नवी मुंबईतही विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात आहेत. नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर योजना, सिडको वसाहतींमध्ये विविध सोयी-सुविधा उभारण्यासाठी महापालिकेमार्फत निधी, एसआरए योजना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जागतिक स्तरावर नवी ओळख प्राप्त होत आहे. भविष्यातही नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच विजयी नगरसेवकांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी पूर्णतः कटिबद्ध राहून एकजुटीने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय चौघुले, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, सरोज पाटील, शीतल कचरे, दमयंती ताई, मनोज माने, विजय हळदणकर, युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, एम. के. मढवी यांच्यासह सर्व विजयी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टीका करणाऱ्यांना खडेबोल
नवी मुंबई महापालिकेत काय सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे कोणीही काही ही टीका करू दे एकनाथजी शिंदे आणि शिवसेना पक्ष येथील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांच्या मागे ठामपणे उभा आहे. नवी मुंबईत महायुती मध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये. येथे लोकशाही आहे हुकूमशाही नाही. असे सर्वांनी लक्षात ठेवावे. असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. तर जे आज शिवसेनेवर टीका करत आहेत त्यांनी आधी जंगलातील बिबट्या सांभाळावे मग शिवसेनेच्या वाघांचा नाद करा असे आव्हान देखील यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी केले ।
