- अनधिकृत मच्छी विक्रीविरोधात कारवाई करण्याची मागणी,कोळी संघटना आक्रमक ।
प्रमोद कुमार
डोंबिवली : कल्याण डोंबिवली मध्ये स्थानिक कोळी मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत अनधिकृत मच्छी विक्रीविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले. हे निवेदन मा. महापौर हर्षाली ताई थविल-चौधरी, डीसीपी साहेब, उपमहापौर साहेब तसेच मा.आयुक्त साहेब यांना देण्यात आले.कारवाई न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात कल्याण परिसरात काही संशयित परदेशी व्यक्तींमार्फत अनधिकृतरित्या मच्छी विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कल्याण स्टेशन परिसर, गोविंदवाडी ब्रिज चौक, चिकणघर परिसर तसेच शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये डोक्यावर टोपल्या घेऊन दारोदारी मच्छी विक्री होत असल्याचे शिष्टमंडळाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. विक्रीस ठेवली जाणारी मच्छी अनेकदा अस्वच्छ व सडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच संबंधित विक्रेत्यांची ओळख व कागदपत्रांची पडताळणी करून अनधिकृत व्यवसायावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा स्थानिक कोळी समाज आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी कोळी महासंघाचे राज्य नेते देवानंद दादा भोईर, खानदेश विभाग प्रमुख सुभाष कोळी, ठाणे ग्रामीण अध्यक्ष रवींद्र भंडारी, कल्याण तालुका अध्यक्ष दशरथ दादा पाटील, महिला तालुकाध्यक्ष वर्षाताई कोनकर, शहाड अध्यक्ष कैलास ढोणे, कार्याध्यक्ष बाबू ढोणे, संपर्कप्रमुख सुनील जाधव, चिटणीस चंद्रकांत मढवी, नीलम कशेळीकर, कुमार गणेश भोईर, कुमार गुरु यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी उपस्थितांनी केली ।
